औदार्य
कोंडुजी नारायण यंगड हे अत्यंत शिस्तप्रिय नॅझरीन ख्रिस्ती व्यक्ती होते. त्यांची सामान्य जीवनातील शिस्त आध्यात्मिक जीवनातही तितकीच प्रखर होती. त्यांच्या तेरा लेकरांना, पत्नी गीताबाई यांना आणि नातेवाईकांना तर त्याचा प्रत्यय यायचाच पण मंडळीतल्या सभासदांना सुद्धा त्याची चांगलीच कल्पना होती. परंतु त्यांच्या शिस्तीएवढेच त्यांचे औदार्य आणि औदार्याची शिकवणही पंचक्रोशीत प्रसिद्ध होती.
त्यांच्या शिस्तबद्धतेमुळे ते पाळकसाहेबांच्या जवळचे असत. आणि कुठल्याच बाबतीत तडजोड त्यांना आवडत नसे.
त्या काळी मंडळीत एक नावाजलेला गुंड होता. त्याची व त्याच्या कुटुंबाची प्रवृत्ती गुंडगिरीची होती. मंडळीतही त्याने त्याची दांडगाई करण्याचा प्रयत्न केला परंतु कोंडुजी त्याला आडवे आले. त्यामुळे कोंडुजीला धडा कसा शिकवता येईल ह्याची तो सतत संधी शोधत होता. कोंडुजीला शारीरिकरीत्या हरवण्याची ताकद त्याच्यामध्ये नव्हती हे त्याला चांगले माहीत होते. तेव्हा कोंडुजीची शिस्त त्याच्या सूड उगवण्याचे माध्यम बनली. कोंडुजी मंडळीमध्ये एकदा प्रार्थना करायला लागले की काहीही होवो ते त्यांचे सर्व मुद्दे पूर्ण होईपर्यंत डोळे उघडत नसत. आपले हात वर ठेऊन ते मोठ्याने प्रार्थना करत असत. गुंडाला ही सवय ठाऊक होती. त्याने कोंडुजीवर प्रार्थना करत असताना हल्ला करण्याचे ठरवले. रविवार आला, भक्ती मंदिरामध्ये कोंडुजीला प्रार्थना सांगण्यात आली. नेहमीप्रमाणे कोंडुजी आपले दोन्ही हात वर करून मोठमोठ्याने प्रार्थना करू लागले. तेव्हा ह्या गुंडाने कोंडुजीवर दोन्ही हातांनी काठीने वार करायला सुरुवात केली. मारहाण करणारा कोण हे कोंडुजीला समजले. कोंडुजीचे शरीर म्हणजे पोलाद. गुंडाच्या काठीचा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. उलट त्यांनी प्रार्थना करता करताच ह्या गुंडाला आपल्या ताब्यात घेतले आणि प्रार्थना पूर्ण होईपर्यंत एका हाताने दाबून धरले. तो गुंड जिवाचा आटापिटा करून कोंडुजीच्या हातातून निसटण्याचा प्रयत्न करत होता. आपण स्वत:वर मरणच ओढवून घेतले आहे हे त्याला समजत होते.
प्रार्थना संपली, भक्ती संपली. लोकांना वाटले आता कोंडुजी ह्या गुंडाला फार बदाडतील. पण त्यांनी म्हटले, “हे भक्ती मंदिर आहे, मी त्याला क्षमा करतो.” तारुण्याने मुसमुसलेल्या कोंडुजीच्या लेकरांना ते पचवणे फार कठीण गेले. पण कोंडुजीच्या शब्दापुढे लेकरं जातील तर ते कोंडुजी कुठले. कोंडुजीने लेकरांना बजावले, “मी त्याला क्षमा केलेली आहे. त्याच्यावर कोणीही हात घालणार नाही.” गुंडाची सर्व योजना विफल झाली.
पुढे अनेक वर्षांनी ह्या गुंडाची अवस्था फारच खराब झाली. भाकरीच्या तुकड्यासाठी तो मोहताज झाला. एके दिवशी कोंडुजीच्या वाड्याचे दार वाजले. कोंडुजीने आरूला सांगितले, “मास्तर, जरा बघा दारावर कोण आहे.” आरूने दार उघडताच त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तो ताबडतोब काठी घ्यायला आत पळाला. कोंडुजीला समजले काहीतरी गडबड आहे. ते बाहेर आले आणि बघतात तर बाहेर तोच गुंड जमिनीवर बसलेला होता. त्याला चालताही येत नसे. तो ढुंगण घासत घासत पुढे सरकत असे. कोंडुजी त्याला म्हणाले, “अरे, काय झाले?” तो म्हणाला, “मिस्तरी, मला भूक लागली आहे. मला गीताबाईच्या हातची भाकर खायला द्या.” कोंडुजीच्या उदार मनाला लगेच पाझर फुटला. त्यांनी म्हटले, “आरू, ती काठी खाली ठेव. आपल्या दारी पाहूणा आला आहे. त्याला उचलून घरात आण.” आरूचे काही चालले नाही. त्याने चुपचाप बाहेर जाऊन गुंडाला हातांनी उचलले आणि वाड्यात आणले. कोंडुजीने त्याला हातपाय धुवायला मदत करण्याची आज्ञा दिली व गीताबाईला मोठ्याने हाक मारून गरम गरम भाकरी टाकायला सांगितल्या. कोंडुजीच्या घरात मटन नसेल असे होत नसे. गीताबाईने गरम गरम भाकरी बनवून मटन करी सोबत गुंडाला यथेच्छा खायला घातल्या. गुंडाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. त्याने बोलून दाखवले, “ह्या घरामध्ये शत्रुंचाही राजेशाही थाटात पाहूणचार होतो हे ऐकले होते, व आज अनुभवले सुद्धा.”
ह्या घटनेचा कोंडुजीच्या लेकरांवर आणि विशेषत: आरूवर भयंकर परिणाम झाला. त्याने आपल्या वडील व आईचे औदार्य आणि अतिथ्यप्रेम नेहमी जोपासले. अनेकदा आरूच्या घरी लोक रात्री-बेरात्री ह्या खातरीने येत असत की आपण आज त्याच्या घरी उपाशी झोपणार नाही. आरूच्या घरी काम करणारे लोक सांगतात, “यंगड साहेबांनी लोकांना पाजलेल्या केवळ चहाचा हिशोब लावून पैसे वसूल केले असते तर त्यांचा मोठा महाल झाला असता.” आरूला त्याची पत्नी शिरीनबाई हिने जबरदस्त साथ दिली. त्याच्या घरी आलेल्या शत्रुचाही आरू खरोखर राजेशाही थाटात वागवून आदरातिथ्य करायचा. आरूच्या ठायी कोंडुजीने स्वीकारलेला ख्रिस्त वसत असे. आणि त्यामुळे त्याला आपले औदार्य मोकळ्या हाताने व्यवहारात आणण्यास कधीच अडचण आली नाही. आणि आरू व त्याच्या कुटुंबालाही देवाने कधीच उणे पडू दिले नाही.
