Thursday, April 30, 2026
आरू

गुडघ्यांवरील प्रार्थनेचे उत्तर!

तो माणूस शरीराने चांगलाच दांडगा होता. पत्निला जबरदस्त मारहाण करीत होता ती वेगळीच पण तो स्वत:च्या वयात येत असलेल्या मुलिवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करीत होता. त्या दोघिंना सोडवायला येणार्‍यांनाही तो झोडपून काढत होता. शेवटी कोणाची त्याला ताब्यात करण्याची हिंमत होईना! हे नेहमीचेच होते. चाळीत राहाणार्‍या शेजार्‍यापाजार्‍यांचा नाईलाज होता, ते प्रयत्न करीत असत पण तो त्या सर्वांवर भारी होत असे.

आरू आपल्या सासुरवाडीत शिरपूरला प्रथमच आपल्या पत्निसोबत आलेला होता. हजार-हजार दंडबैठका मारणे, तासनतास व्यायम करणे हे त्याचे नित्याचे होते. अनेकांना आपल्या शक्तिने आरूने पाणी पाजलेले होते, अनेकांना धुळ चाटवलेली होती आणि शेजारी सुरू असलेला हा सर्व प्रकार पाहून आरू भडकला. त्याच्या स्नायुंमध्ये स्फुरण चढले व तो ह्या दांडग्या माणसाशी दोन हात करायला सरसावला. तोच सासरे आडवे आले व आरूची समजूत घालू लागले. ते म्हणाले जावई, “आपण शक्तिशाली आहात पण ह्या माणसाच्या ठायी असणारी शक्ती ही मानवी नाही. त्याच्यामध्ये दुरात्मा आहे.” आरूच्या मनाला ते मान्य नव्हते. आरूने उडी मारली व त्या दांडग्या माणसाला ललकारले. दोघांची झटापट सुरू  झाली. थोडावेळ डावपेचांवर डावपेचांची कुरूघोडी झाली. शेजारचे पाजारचे हे द्वंद्व बघण्यास लगेच गोळा झाले. त्यांच्या मनातल्या मनांत आरूने ह्या माणसावर हावी होऊन त्याला ठेचावे ही इच्छा उकळत होती. पण एक क्षण असा आला की त्या दुरात्म्याच्या शक्तिने आरूवर वर्चस्व केले आणि त्या माणसाने आरूला जमिनीत असे दाबून धरले की आरूचा जीव गुदमरू लागला. आरूने असे कधीच अनुभवले नव्हते. त्याची मानवी शक्ती, आतापर्यंतच्या द्वंद्वांचा अनुभव, हे सगळे फोल ठरत होते. बघ्यांच्या मनांत निराशेची पाल चुकचुकली. आरूचे सासरे आणि पत्नी डोक्यावर हात मारून घेत होते. जावयाने ऐकले असते तर बरे झाले असते! हा विचार त्यांच्या मनांत सतत येत होता. ह्यानंतर होणारी नालस्ती कशी झेलावी ह्याची काळजी वेगळीच. ही शक्ती अमानवीय आहे हे समजण्यास आरूला क्षणाचाही वेळ लागला नाही. आरू गुडघ्यावर होता आणि हा माणूस त्याला जमिनीत दाबतच चाललेला होता. त्याक्षणी गुडघ्यांवरच असतांना आरूने स्वर्गीय देवाला मनांतल्या मनांत आरोळी मारली व म्हटले, “देवा आज मला ह्या सैतानावर विजय देशील तर माझे सर्व आयुष्य तुझ्या सेवेला वाहून देईन.” आणि काय चमत्कार दुसर्‍याच क्षणी आरू वर आणि तो माणूस खाली. देवाची शक्ती सैतानाच्या शक्तिपेक्षा मोठी. आरूने त्या माणसाला असे दाबून नामोहरम केले की जणू काही एखाद्या मांजराने लहान उंदराला आपल्या पंज्यात दाबावे. आरूने त्याला अजून चेचला आणि दोरी मागवून झाडाला बांधून टाकला. त्या दिवशी देवाचे अद्भुत सामर्थ्य आरूने पुन्हा एकदा अनुभवले. त्याने गुडघ्यांवरून केलेल्या प्रार्थनेचे देवाने त्याला पुन्हा उत्तर दिलेले होते. आरूच्या परिवर्तनाच्या पायर्‍यांमधील ही एक अत्यंत रोमांचक घटणा तर आहेच पण ह्यानंतर आरूच्या जीवनातील अनेक द्वंद्वांवर, अनेक संघर्षांवर आणि नानावीध युध्दांवर विजय मिळविण्याचा हा मंत्र आरू शिकलेला होता. ह्या नंतर जीवनात आरूने असे युध्दच बघितले नाही जे देवासमोर गुडघे टेकून केलेल्या प्रार्थनेद्वारे जिंकता येणार नाही.

जवळपास २५-३० वर्षांनंतर, आरू आपल्या कुटुंबासह वचनाच्या सेवेकरिता एका मिशन ठाण्यावर गेला होता. त्या मिशनच्या चाळीतील एक स्त्री दारात उभी राहून आरूला न्याहाळत होती. थोड्या वेळाने ती चालत आरूकडे आली आणि म्हणाली, “अंकल मला ओळखले का?” आरूने उत्तर दिले, “नाही बाई, कोण आपण?” त्यावर ती म्हणाली, “अंकल मी तिच मुलगी आहे, शिरपूरची, जिला तुम्ही लहानपणी वाचवले होते!” आरूच्या आनंदाला पारावार उरला नाही. आरूने आपल्या पत्निला बोलावले आणि देवाची खुप स्तुती केली.

One thought on “गुडघ्यांवरील प्रार्थनेचे उत्तर!

  • हा ब्लॅाग वाचल्यानंतर माझी पहिली प्रतिक्रिया ही होती की मी गुढघ्यांवर येऊन प्रार्थना केली की प्रभु, जेंव्हा कधी मी प्रतिकूल व दूष्ट शक्तिंनी दबला जाईल त्यावेळी मी न खचता ‘आरू’ सारखी प्रार्थना करावी व ती तू स्वीकारली आहे याचा आनंद व अनुभव घ्यावा.
    टेंभा उलटा करून खाली दाबला तर अधिक उफाळतो आणि ज्याने खाली,उलटे, केले त्याच्याच हाताला घातक होतो. ‘आरू’ यांचे बाबतित अगदी असेच झाले.
    एक गोष्ट मात्र खरी,दिलेलं वचन स्मरणात ठेवणे व पूर्णत्वास नेणे हे काम नाही येड्या गबाळ्याचे तेथे पाहिजे जातीचे.

    Reply

Leave a Reply to Sunil Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *