Saturday, July 18, 2026
आरू

२ च्या ५०!

आरू आपले पहिले पाळकपण बुलढाणा जिल्ह्यातील मेहेकर येथे यशस्वीरीत्या पूर्ण करत होते. बंद अवस्थेत असलेल्या या मंडळीमधील समस्याग्रस्त लोकांना ख्रिस्ताच्या प्रीतीने जिंकून आणि ख्रिस्ती दृष्टिकोन समजावून सांगून त्यांनी त्यांना नियमितपणे मंडळीत आणले होते, ज्यामुळे ती मंडळी पुन्हा सुरळीत सुरू झाली.

त्या वेळी मंडळ्यांमधून पुरेसे उत्पन्न मिळत नसे आणि मिशन त्यांना केवळ दीडशे रुपये पगार देत असे. अशा परिस्थितीत पत्नी आणि दोन लहान मुले अशा आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, हे आरूला देवानेच शिकवले. पाळकांना दुसरे कोणतेही काम करून अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यास मिशनकडून सक्त मनाई होती. पण मग आरूने पर्यायी मार्ग शोधला नसता, तर ते आरू कसले!

आरूचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व असे होते की ते जिथे जात, तिथे लगेच लोकांशी संपर्क वाढवत असत. एका पशुवैद्यकीय (व्हेटर्नरी) डॉक्टरांनी त्यांना कोंबडीची काही पिल्ले अगदी स्वस्त दरात दिली. वडिलांमुळे आरूला पाळीव प्राणी कसे सांभाळायचे, याची चांगली जाण होती. आरूने ती पिल्ले आणून त्यांची उत्तम काळजी घेतली. त्यांच्यासोबतच दुसऱ्या एका व्यक्तीनेही तशीच पिल्ले घेतली होती; परंतु त्याला ती सांभाळता आली नाहीत आणि ती मरू लागली. तेव्हा त्याने ती सर्व पिल्ले खरेदी दरापेक्षाही कमी किमतीत आरूला देऊन टाकली. देवबाप आपल्या सेवकाने विश्वासूपणे केलेल्या श्रमांवर नेहमी आशीर्वाद देतो. लवकरच ती पिल्ले मोठी होऊन अंडी देऊ लागली. त्यातून मुलांच्या उत्तम आहाराचा प्रश्न सुटला. आरूने आजूबाजूच्या प्रतिष्ठित लोकांमध्ये अंडी उपलब्ध असल्याचे सांगितले, ज्यामुळे ते लोक आरूकडून अंडी विकत घेऊ लागले. हा व्यवसाय चांगला स्थिरावत असतानाच, आरूची बदली दुसऱ्या एका मंडळीवर झाली. ती मंडळी देखील गेल्या दोन-अडीच वर्षांपासून बंद पडलेली होती, तरीही आरूने तिथे जाण्यास आनंदाने होकार दिला.

त्यांच्या जागी मेहेकरला दुसरे एक ज्येष्ठ पाळक व त्यांचे कुटुंब आले. त्यांच्या मुलाने अलीकडेच साक्ष दिली की, आरू त्यांच्या आईला आपली बहीण मानत असत. घर सोपवताना आरूने त्या पाळकीन बाईंना म्हटले, “आक्का, या दोन कोंबड्या तुमच्याजवळ राहू द्या. त्या अंडी देतात, घरी खाण्यासाठी त्यांचा उपयोग होईल.” आरूचा मागील दोन वर्षांचा अनुभव त्यांना या कुटुंबाच्या पुढील वाटचालीसाठी साहाय्य करत होता. पाळकांच्या मुलाने साक्ष देताना पुढे म्हटले, “मामांनी दिलेल्या कोंबड्या खरोखरच रोज अंडी देणाऱ्या होत्या. ती अंडी घरी खाण्यासाठी उपयोगी तर पडलीच, पण माझ्या आईने त्यातील काही अंडी गोळा करून ती उबवली आणि त्यापासून तब्बल ५० कोंबड्या तयार केल्या. त्याद्वारे आमच्या कुटुंबाला मोठा आर्थिक हातभार लागला.” ते पुढे म्हणाले, “आमचे नातेवाईक १५-१५ दिवस आमच्या घरी येऊन राहत असत, तरीही देवाने आम्हाला कधीच कशाचीही उणीव भासू दिली नाही.” देवाच गौरव असो!

या पाळक कुटुंबाचे व आरूचे संबंध नेहमी सलोख्याचे तर राहिलेच, परंतु त्यांच्या मुलांमध्येही सख्य राहील याची आरूने काळजी घेतली. त्यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत देवाची विश्वासाने सेवा केली आणि देवाने दोन्ही कुटुंबांचे कल्याण केले.

देवाचे वचन स्तोत्र १ मध्ये म्हणते की जो धार्मिक पुरुष आहे तो, “जे काही हाती घेतो ते सिद्धीस जाते.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *